हिंदी चित्रपटांचे (आणि देशाचे) भविष्य

भारतीय सिनेमाला शंभराहून अधिक वर्षांची परंपरा आहे. सर्व प्रमुख भाषांमधून दरवर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या काही हजारांमध्ये जाते. मात्र हिंदी सिनेमाचा प्रभाव देशभर आहे. तो अनेक प्रकारचा आहे. त्यातील ‘हिंदी चित्रपट आणि आयडिया ऑफ इंडिया’ ही संकल्पना समोर ठेवून लिहिलेला  ‘हिंदी चित्रपट आणि देश’ हा दीर्घ लेख चार भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा शेवटचा लेख. 

देशाच्या जडणघडणीत प्रमुख भूमिका बजावणारा घटक म्हणजे सरकार! त्या त्या वेळच्या सरकारांबद्दलची हिंदी चित्रपटांची मते कधीच अनुकूल नव्हती. सरकार आणि सरकारी यंत्रणा म्हणजे हिंदी चित्रपटांतील एक मोठा ‘व्हिलन’ आहे (याला फक्त युद्धपट अपवाद). हिंदी चित्रपटांत गाव, शहर ते थेट देश पातळीपर्यंतचे राजकारण कायम बरबटलेलेच पाहायला मिळते. हिंदी चित्रपटात राजकारण्यांचा हिंसाचार (विशेषतः निवडणूक काळांतील) सतत येतो. पार बिघडलेला, ‘आउट लाईन’ला गेलेला नायक बदलेल, कन्फर्म्ड व्हिलनचेही एकवेळ मतपरिवर्तन होईल, पण हिंदी चित्रपटांतले राजकारणी मात्र सुधारण्याचे नाव घेणार नाहीत. ते पूर्वी होते त्यापेक्षा जास्त खुनशी आणि निगरगट्ट होत चाललेले आहेत (वस्तुस्थितीदेखील यापेक्षा वेगळी नाही, हा भाग वेगळा). राजकारणी म्हटला की तो व्हिलन (उघड वा छुपा) असणार म्हणजे असणारच. डोळे झाकून पैज लावू शकता!  हिंदी चित्रपटाने राजकारण्यांना त्यांची जागा बरोबर दाखवून दिली आहे. आणि जनमानसाच्या मनात ती प्रतिमा चांगलीच ‘फिट’ झाली आहे. गुन्हेगार पोसणारे, गुन्हेगारी वृत्तीचे, गुन्हेगारी हा प्रमुख व्यवसाय तर राजकारण हे ‘पॅाकेट मनी’ असलेले राजकारणी हिंदी चित्रपटांत असंख्य वेळा पाहायला मिळतात.

मोना डार्लिंगला व्हिलन अजित सतत सांगत असे की, “जब पुरा हिंदुस्तान जल रहा होगा, तब तक हम दूर कहीं जा पहुँचे होंगे." राजकारणीही हेच स्वप्न पाहत असत. ‘देशकी तबाही’ करण्यासाठी ते पाकिस्तानी अतिरेक्यांची मदत घेत, आणि हे करण्यासाठी त्यांनी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दिवस खास राखून ठेवलेले असत. सरपंच ते थेट गृहमंत्र्यांपर्यंत जाणारी ही उज्ज्वल गुन्हेगारी परंपरा हिंदी चित्रपटाने सतत तेवत ठेवलेली आहे (खास हिंदी मसाला चित्रपटासाठी लिहिलेल्या पटकथेप्रमाणे आपल्या देशाचा कारभार चाललेला आहे). हिंदुस्तानला ‘थूक लावून’ परदेशात पसार होणे, हे स्वप्न विजय मल्या, नीरव मोदी, मेहूल चोक्सी यांनी प्रत्यक्षात आणलेले आहे.

भारतीय माणसाचे देशावर प्रेम नाही का? तर सर्व दोषांसकट आहे. अगदी परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय लोकांचेही आहे. (उलट त्यांना जरा जास्तच आहे.) गोवारीकर यांच्या ‘स्वदेस’ चित्रपटात असाच  ‘नासा’ मध्ये काम करणारा, परदेशस्थित शाहरुख खान दिसतो. त्याला देशासाठी काहीतरी करायचे आहे. परदेशस्थित भारतीय दिग्दर्शकांनी (इंग्रजीमधून असतील, मात्र) भारतीय विषयच निवडलेत. उदा. मीरा नायरचा ‘सलाम बॉम्बे’, दीपा मेहताचे ‘वॉटर’, ‘अर्थ’(Earth) व ‘फायर’ आणि नागेश कुकनूरचा  ‘मान्सून वेडिंग’. भव्य भारतीय विवाह, एकत्र कुटुंबपद्धती हिंदी चित्रपटांत टिकून आहेत. भविष्यातही त्या अधूनमधून डोके वर काढत राहणार. विदेशात तर आजही त्याबद्दल कमालीचे औत्सुक्य आहे.

देश या अमूर्त संकल्पनेत जन्मभूमी, स्थिरावलेला समाज, भूप्रदेश, सरकार, सार्वभौमत्व, स्वातंत्र्य-समता-बंधुता ही नीतीमूल्ये, असे घटक असले तरी जोवर आपण त्यांच्याकडे विहंगम दृष्टीने (Birds eye viewने) पाहत नाही तोपर्यंत देश या संकल्पनेची प्रचिती येत नाही. हिंदी चित्रपटांतून ती अशी एकत्रितपणे येते हे नक्की!

सामाजिक-राजकीय स्थित्यंतरे, बदलती नितीमूल्ये, नातेसंबंध, जागतिकीकरण याची निश्चित दखल घेत हिंदी चित्रपट बदलत होता. चित्रपट शिक्षण आता ‘मिडिया स्टडीज’मध्ये आलेले असल्याने तरुण पिढी चित्रपटांकडे अभ्यास म्हणून पाहत होती; जगातले उत्तमोत्तम दिग्दर्शक पाहत होती, अगदी पिटातला प्रेक्षकदेखील आता समर्थ गोष्टींची मागणी करत होता. कथानक उत्तम असलेले चित्रपट त्यांत मोठे ‘स्टार्स’ नसले तरी चालत होते.

इलेक्ट्रॉनिक मिडीयाने लोकांच्या सवयी आणि मागण्या पूर्णपणे बदललेल्या होत्या. सर्व देश किमान एक तास उशिरा झोपत होता. टीव्हीवरच्या जाहिराती बाजारपेठा ठरवत होत्या. छोटे मूल याबाबतीत डिसीजन-मेकर झाले होते. चित्रपटाचे हे छोट्या पडद्यावरील रूप कुटुंबप्रधान, त्यातूनही ‘स्त्रीप्रधान’ (Woman centric) होते. त्यामुळे त्यांना रुचेल असा आशय देणे अपरिहार्य होते.

या काळात चित्रपटाची आयुधे (कॅमेरे, संकलन-सामग्री) जशी बदलली, तशीच संकलनाची लयदेखील बदलली. पूर्वीचे अगदी क्लासिक चित्रपटही प्रेक्षकांना संथ वाटू लागले, कारण प्रेक्षक आता जीवनाच्या ‘Fast Track’वर जाऊन पोहोचले होते. यात तंत्रज्ञानाचा वाटा होताच. पूर्वी चित्रपट फिल्म रिळांवर चित्रित होत. रिळे ‘प्रोसेस’ झाल्याशिवाय त्यात काय आहे हे दिसत नसे. संकलनदेखील फिल्म हाताने कापून होत असे. आज फिल्मवरचे चित्रीकरण हद्दपार झालेले आहे. आता चित्रीकरण प्रामुख्याने ‘अ‍ॅलेझ्का’ किंवा ‘रेड-एपिक’सारख्या अद्ययावत 4K HD कॅमेरांवर होते. काय चित्रित होत आहे, हे प्रत्यक्ष दिसत असते. एखादा ‘टेक’ आवडला नाही तर तो तिथेच ‘इरेज’ करता येतो. त्यामुळे कॅमेरामनची तांत्रिक ताकद खूपच वाढली आहे. संकलनाचे तंत्र तर फारच उत्क्रांत झाले आहे. चित्रपट संकलन आता संगणकावर होते. ‘स्मोक’, ‘डा-व्हिन्सी रिझॉल्व’ यांसारखी प्रगत ‘सॉफ्टवेअर्स' आज उपलब्ध आहेत. त्यामुळे, कल्पनेच्या भराऱ्या मारण्यास आता तांत्रिक मर्यादा नाहीत. काही प्रोफेशनल जागतिक चित्रपट आता चक्क मोबाइलवर चित्रित झालेत. चित्रपटनिर्मिती सामान्य माणसाच्या आवाक्यात आलेली आहे.  यु-ट्यूबसारख्या वेब-बेस्ड चॅनेलवरून आपल्या कलाकृतीचे जगभर प्रसारणही करता येणेही शक्य झाले आहे. एका अर्थाने हे ‘Power to the People’च आहे.

आजही चित्रपट तीन फॉरमॅटमध्ये दाखवला जातो. सिंगल स्क्रीन थिएटर्स सेल्युलाइड रिळे दाखवतात. मल्टिप्लेक्समध्ये J2K व्हिडीओ- दाखवला जातो तर UFO तंत्रज्ञानाद्वारे तो एकाच हार्डडिस्कवरून सॅटेलाईटद्वारे सर्व थिएटर्सपर्यंत पोहोचतो. सार्वजनिक थिएटर्स बहुदा येत्या काळात लयाला जातील. स्मार्ट टीव्हीमुळे स्वतःच्या निवडीचे चित्रपट आता घरबसल्या पाहता येतात. मोबाईल प्रोजेक्शन हे प्रसारणाचे एक प्रमुख माध्यम होईल. (खरं तर मोबाईल हे मानवी अस्तित्वात एक आघाडीचं उपकरण बनेल. उत्क्रांतीत माणसांचे अंगठे इतर बोटांपासून विलग झाले, ते काय उसाचं गुऱ्हाळ चालवण्यासाठी? भविष्यात मोबाईलवर खेळ खेळण्यासाठी आणि टेक्स्ट करण्यासाठी, म्हणून तर ते अंगठे अलग झाले.)

माध्यमांच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे प्रेक्षकांची अभिरुची बदलत आहे, त्याप्रमाणे चित्रपटदेखील बदलत आहेत. पुढील दहा वर्षांत हिंदी चित्रपटातील देशाचे चित्र कसे असेल, याचे उत्तर देणे आज तरी कठीण आहे. मुळात, देश आहे त्या स्वरुपात (म्हणजे civic nation) असेल की, त्याचे ‘वांशिक राष्ट्र’ (Ethnic Nation) झालेले असेल? सेन्सॉरशिप कितपत असेल? जागतिक चित्रपटाचा प्रभाव ‘चित्रपट-बाजारपेठेवर’ किती असेल? चित्रपट बघण्याचे स्वरूप काय असेल? आज वेबसिरीजमुळे चित्रपटाचे सामुहिक, विधिवत रूप जाऊन त्याची जागा वैयक्तिक अनुभवाने घेतली आहे. (खासगीत भारतीय माणूस भरपूर चावटपणा करतो, आणि चावट चित्रपट बघतो. तो धोका देखील आज वेब-सिनेमाचे स्वरूप ठरवतो आहे) आज तरी वेबसिरीजवर सेन्सॉरशिप नाही. त्यामुळे आजच्या काळातील राजकारणावर टीका करणारी दीपा मेहता दिग्दर्शित ‘लीला’सारखी वेबसिरीज येऊ शकली.

‘लीला’मध्ये ‘आर्यावर्त’ नावाचे एक हिंदूराष्ट्र निर्माण झालेले आहे. जोशीजी त्याचा  प्रमुख आहे-ज्याला सर्व ‘गुरु मॉं’ म्हणतात. या राष्ट्रात स्त्रियांना दुय्यम वागणूक आहे. भिन्नधर्मीय लोकांशी लग्न केलेल्या स्त्रियांची रवानगी ‘श्रम केंद्रा’त होते. तिथे त्यांचे ‘शुद्धीकरण’ केले जाते. मुसलमानांशी लग्न केलेली नायिका शालिनी (हुमा कुरेशी) अशाच प्रसंगातून जाते आहे. तिच्या मुलीला म्हणजेच लैलाला ‘आर्यावर्त’ने ताब्यात घेतलेले आहे. ‘देशप्रेमाचे’ संस्कार अगदी लहानपणापासून मुलांवर केले जात आहेत. (थोडक्यात, त्यांचे ब्रेनवॉश केले जात आहे.) दुसरीकडे संघप्रमुखांसारखा पालक संघाचा माणूसदेखील आहे. तो शाखा घेत आहे. अगदी 'ऑरवेल'च्या 1984, किंवा हक्सलेच्या ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’सदृश्य परिस्थिती आहे. या कथानकाची प्रारंभीची अवस्था आज प्रत्यक्ष दिसतेच आहे. आज सेन्सॉरशिप नसल्याने ‘वेब’द्वारे अख्खे जग ते पाहू शकते आहे. पुढे अशी परिस्थिती राहीलच असे नाही, कारण वेब सेन्सॉरशिपची मागणी आता जोर धरत आहे.

पुढच्या काळात हिंदी चित्रपटांतून येणारे देशाचे चित्र कसे असेल? नेहरूयुगात देशाला भविष्याकडे बघण्यासारखे बरेच काही होते. आजही समस्या त्याच आहेत. ठोस असे काही हाताला लागलेले नाही. यामुळे आज आपण आणि हिंदी चित्रपट आपल्या ‘गौरवशाली’ इतिहासाकडे वळतोय (आणि नवा ‘गौरवशाली’ इतिहास नव्याने लिहितोय). पद्मावतसारखा जोहारचे संदिग्ध उदात्तीकरण करणारा चित्रपट घ्या किंवा ‘केसरी’सारखा ‘केसरिया’चा गौरव करणारा चित्रपट घ्या, ते सर्व भूतकाळात रमताना दिसत आहेत. भविष्यातही चित्रपट आपल्या ‘उज्ज्वल’ भूतकाळाकडेच वळतील अशी चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे, 'उरी’ ‘किंवा ‘मिशन मंगल’ला मिळालेला प्रतिसाद बघता अशा ‘अभिमानास्पद’ घटनांची लगेच दखल घेतली जाईल असेही दिसते. आणि त्या घटनांचे श्रेय मात्र सरकार घेईल. (खरे पाहता या घटना प्रत्येक देशाचा एक अविभाज्य भाग असतात. मात्र आज ‘जाज्ज्वल्य देशप्रेम’ दाखवण्यासाठी याशिवाय इतर काही उरलेलं नाही काय? शिवाय ‘देशप्रेम’ म्हणजे दशावतारातील मारुती गंजीफ्रॉक फाडून ‘हिते हैती राम परभु’ म्हणून छप्पन इंच छाती दाखवतो तशी ‘दावण्याची’ ती वस्तू आहे की काय?) गोष्ट  सिनेमॅटिक असेल तर चित्रपट येण्यास काहीच हरकत नाही. पण तो तेवढयापुरता सीमित राहू नये. भविष्यातील चित्रपटांमध्ये आजोबांच्या पोथीतील पुष्पक विमानाचा आराखडा शोधून, तो शत्रूंपासून वाचवण्यासाठी धडपडणारा वैमानिक नातू दिसू शकतो, गायीचे दुध पिऊन शंभर कमांडोना लोळवणारा भारतीय कमांडो दिसू शकतो. शिवाय हेडगेवार, नथुराम गोडसे यांच्यावर ‘बायो-पिक्स’ यायला काहीच अडचण असणार नाही. अत्यंत ‘सस्पेन्स’, ‘धावतं’ कथानक असूनही दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या किंवा ‘व्यापम’सारख्या हत्याकांडावर चित्रपट येणं मात्र कठीणच दिसत आहे. 

भविष्यातील हिंदी चित्रपटांत पाकिस्तानी अतिरेकी, खुफिया एजंट जरा जास्तच डोकं वर काढतील हे मात्र नक्की. उतारा म्हणून वेगळे प्रश्न मांडणारा कौटुंबिक चित्रपटही येईल. एकत्र कुटुंब, भव्य भारतीय लग्न (ज्याचं आजही सर्व जगाला कुतुहल आहे.), ‘करवाचौथ’ असे विधी आणि हिंदू परंपरांचे पुनरुज्जीवन होईल. (आज तरी ‘बॉलिवूड’ ‘माणसात’ आहे. आणि माणसांबद्दल बोलत आहे. तिथे ‘हॉलिवूड’मध्ये ‘हैदोस मांडणे ’ हीच प्रमुख थीम आहे. भूगर्भातून आलेले प्रचंड किरणोत्सारी प्राणी, माणसांचे झालेले व्हँपायर्स, वेर्वूल्फ, खुनी रोबो किंवा परग्रहावरून पृथ्वीवर आक्रमण करणारे चित्रविचित्र एलिअन यांनी पश्चिमेत एकच उच्छाद मांडलाय! आणि परग्रहावरील आक्रमण थोपवणार कोण, आणि पृथ्वीला वाचवणार कोण? तर अर्थात अमेरिका! ‘जगाचे पोलीस’ ही अमेरिकेची अधिकृत भूमिका हॉलिवूड चित्रपट हिरीरीने मांडत आहेत.)

भविष्यातील हिंदी चित्रपट कसा असेल? उत्तर सोपे आहे, त्या काळात देश जसा असेल तसा चित्रपट असेल. धगधगत्या विश्वात चित्रपट असेल का असे विचारणे म्हणजे ‘दुःखी जगात गाणे असेल का?’ असे विचारण्यासारखे आहे. दुःखी जगात दुःखी गाणे असेल. हिंदी चित्रपट हा देशाचा आरसा आहे. तो कधी खोटे बोलणार नाही. पण जर देशाने आरशालाच बहिर्गोल-अंतर्गोल करून Distorted, अतिरंजित प्रतिमा दाखवायला भाग पाडले तर? चित्रपटाला खोटे बोलायला लावले तर? तर इतर देशांत जे झाले ते इथेही होईल. खरा चित्रपट अंडरग्राऊंड जाईल!

- मेघनाद कुळकर्णी
eureka.publicity.mk@gmail.com
(लेखक जाहिरात क्षेत्राशी संबंधित असून त्यांनी चित्रपटांसंबंधी विषयांवर सातत्याने लिखाण केले आहे.)

चार  भागांत प्रकाशित झालेल्या  या लेखाचे  इतर भाग वाचा :

हिंदी चित्रपट आणि भारतीय स्वातंत्र्यलढा 

स्वतंत्र भारत आणि हिंदी चित्रपट 

सामाजिक स्थित्यंतरे आणि हिंदी चित्रपट

Tags: Film Movies Cinema and India Meghnad Kulkarni भारत आणि चित्रपट सिनेमा चित्रपट मेघनाद कुळकर्णी हिंदी चित्रपट Load More Tags

Add Comment