भाग्यवान तो देश ज्यास गौरवशाली इतिहास नाही!

कॅनेडियन लोक बडेजाव न मिरवणारे आणि काहीसे व्यवहारी भासू शकतात, कारण त्यांना अभिमानाने मिरवण्यासाठी इतिहासाचा महान वारसा काही लाभलेला नाही.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी

सप्टेंबर महिन्यात मी चार देशांचा दौरा केला. महिन्याची सुरुवात मी माझ्या मातृभूमीतून म्हणजेच भारतातून केली. एकेकाळी महात्मा गांधींच्या नेतृत्त्वाखाली अहिंसक चळवळीद्वारे स्वातंत्र्य मिळवून भारताने इतर वसाहतीक देशांना दिशा दाखवण्याचे कार्य केले होते. आता भारताचे राजकीय नेतृत्व जो इतिहास अधोरेखित करू इच्छिते, तो इतिहास भूतकाळात आणखी खोलात जाऊ पाहतो. यात काहींसाठी पृथ्वीराज चौहान आणि शिवाजी महाराज यांनी केलेला मुस्लिमांचा प्रतिकार अधोरेखित केला जातो तर काहींसाठी गुप्त साम्राज्याची महानता अधोरेखित केली जाते.
    
जे लोक आज भारतात सत्तेत आहेत, त्यांचे वैचारिक गुरु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तब्बल पस्तीस वर्षे प्रमुख राहिलेले मा. स. गोळवलकर होते. आपल्या महान, गौरवशाली भूतकाळामुळे भविष्यात हिंदूंनाच जगाचे नेतृत्व करायचे आहे यावर दृढ विश्वास ही संघाच्या अनुयायांनी आपल्या सरसंघचालकांकडून आत्मसात केलेली महत्त्वाची शिकवण. ‘भव्य आणि वैश्विक एकतेचा पुरस्कार करणारे हिंदू तत्त्वज्ञानच चिरकालीन मानव बंधुता स्थापन करण्यासाठीचा ठोस पाया पुरवू शकते,’ असा गोळवलकरांचा दावा होता. ‘जगाचे नेतृत्व करणे, ही नियतीने हिंदुंवर टाकलेली एक दैवी जबाबदारी आहे’, असाही त्यांचा दावा होता.

भारतामधून मी इंग्लंडला रवाना झालो. भारताप्रमाणेच येथील राजकारणीदेखील आपल्या भूतकाळातील यशाला वारंवार अधोरेखित करतात. मग यात ब्रिटन, म्हणजे लोकशाही आणि संसदेची जननी म्हणून असो किंवा आधुनिक औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ करणारे राष्ट्र म्हणून! शेक्सपियर आणि डार्विनची जन्मभूमी म्हणून असो किंवा दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या आव्हानाला पुरून उरणारे एकमेव राष्ट्र म्हणून.. ब्रिटनची आपल्या स्वप्रतिमेबद्दल नेहमीच अशी धारणा राहिली आहे की, आपण जगाला भूतकाळात खूप काही शिकवले आहे आणि भविष्यातही खूप काही शिकवण्याची क्षमता बाळगून आहोत.

सप्टेंबर महिन्याचा शेवट मी अमेरिकेत केला. 2016च्या निवडणुकीत येथील वर्तमान राष्ट्राध्यक्ष मुळात निवडून आले, ते अमेरिकेला आपले गतवैभव पुन्हा मिळवून देण्याची (मेक अमेरिका ग्रेट अगेन) घोषणा देऊनच. अनेक अमेरिकन नागरिकांना आपल्या देशाचा इतिहासच सर्वात महान आहे, असा टोकाचा अभिमान असतो. आणि ते त्याचा अत्यंत हिरिरीने पुरस्कारदेखील करतात. इतिहासात रमणाऱ्या अमेरिकनांना यावर ठाम विश्वास असतो की, ब्रिटनच्या साम्राज्यवादापासून स्वातंत्र्य मिळवून लोकशाहीची सनद जाहीर करणाऱ्या राष्ट्र संस्थापकांचा काळ हा अमेरिकेचा सुवर्णक्षण होता. त्याचबरोबर पुरोगामी अमेरिकनांना वाटते की, फ्रँकलिन डेलानो रुझवेल्ट आणि त्यांच्या ‘न्यू डील’चा कालखंड हा अमेरिकेचा सर्वात महान क्षण होता. तर प्रतिगामी अमेरिकनांना वाटते की, रोनाल्ड रेगन राष्ट्राध्यक्ष असताना सोव्हियत युनियनला गुडघे टेकायला लावणे, हा अमेरिकेचा सर्वात महान क्षण होता. परंतु हे वैचारिक मतभेद बाजूला ठेवल्यास, सर्व प्रकारच्या अमेरीकन नागरिकांना यावर ठाम विश्वास असतो की, त्यांचे राष्ट्र अजूनही मानवतेसाठीची शेवटची आणि सर्वोत्कृष्ट अशी आशा आहे.

सहसा माझा अमेरिकेचा प्रवास लंडनमार्गे होत असतो. पण यावेळी मात्र मी आधी कॅनडाला गेलो आणि तिथून अमेरिका. सप्टेंबर महिन्यात मी भेट दिलेल्या चार देशांपैकी फक्त कॅनडाच असा देश आहे, जो स्वतःकडे महान, प्रभावशाली भूतकाळ असण्याचा गर्व करत नाही. अर्थातच शून्य, योगा किंवा प्लॅस्टिक सर्जरीचा शोध लावणारे कॅनडियन नव्हते किंवा उत्क्रांतीच्या सिद्धांताचा अथवा विजेचा शोध लावणारे कॅनडियन नव्हते. जगातील सर्वात संपन्न लोकशाही निर्माण करणारे अथवा असंख्य नोबेल विजेते घडवणारी विद्यापीठे निर्माण करणारे लोकदेखील कॅनडियन नव्हते.

कॅनडाला मी यापूर्वी अनेकदा गेलो आहे. आणि प्रत्येक भेटीमध्ये, मी या देशाच्या अधिकच प्रेमात पडलो आहे. या देशाला एक विशिष्ट प्रकारचे, निश्चल आणि बडेजाव न मिरवणारे व्यक्तित्त्व लाभले आहे; जे या देशाच्या दक्षिणेकडील शेजाऱ्याच्या तुलनेत अतिशय वेगळे आहे. कॅनडाकडे अभिमान करण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत परंतु तरीही कॅनिडीयन नागरिक कधीही बडेजाव मिरवताना दिसणार नाहीत. कॅनडाकडे अतिशय चांगली अशी सार्वजनिक सरकारी विद्यापीठे आणि उत्कृष्ट सार्वजनिक आरोग्य योजना आहे. एकेकाळी फक्त गोऱ्या व्यक्तींसाठी मर्यादित असणाऱ्या आणि वांशिक भेदभाव करणाऱ्या समाजापासून आता विभिन्न संस्कृतींच्या जनतेचे खुल्या दिलाने स्वागत करण्यापर्यंत, कॅनडामध्ये परिवर्तन घडून आले आहे. कॅनडामधील वेस्ट इंडियन, दक्षिण आशियायी आणि चीनी वंशाचे स्थलांतरित नागरिक हे इतर कोणत्याही पश्चिमी राष्ट्रातील स्थलांतरितांपेक्षा इथल्या संस्कृतीत जास्त चांगल्या प्रकारे संमिलीत झाले आहेत. मात्र या बाबीतही तथ्य आहेच की, इथल्या मुळच्या आदिवासी जनतेसोबतची कॅनडाची वर्तणूक निश्चितच आदर्श राहिलेली नाही. मात्र आपल्या अमेरिकी शेजाऱ्यांच्या अगदी विपरीत, कॅनडाचे नागरिक आपल्या या वर्तणुकीबद्दल निदान खेद तरी व्यक्त करतात.

माझ्या या कॅनडा भेटीवरून मी असा निष्कर्ष काढला की, ज्या राष्ट्रांना (खरा अथवा कल्पित) महान इतिहास नसतो, ती राष्ट्रे नक्कीच अशा प्रकारचा इतिहास असणाऱ्या राष्ट्रांपेक्षा जास्त भाग्यवान असतात. बोरिस जॉनसनच्या अनुयायांना आपला नेता विन्स्टन चर्चिल सम भासणे अथवा नरेंद्र मोदींच्या अनुयायांना त्यांचा नेता नवे 'शिवाजी महाराज' अथवा नवा 'हिंदूहृदयसम्राट' भासणे याने इंग्लंड आणि भारताला भेडसावणाऱ्या संरचनात्मक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निश्चितच कसलीच मदत होणार नाही. सप्टेंबर महिन्यात मी भेट दिलेल्या चौथ्या राष्ट्रात म्हणजेच अमेरिकेतील जनसामान्यांमध्ये आपल्याकडे विलक्षण आणि वैभवशाली भूतकाळ असण्याचा विचार खोलवर रुजलेला आहे. उदाहरणादाखल रशिया आणि तुर्कस्तान यांचादेखील आपल्याला विचार करता येईल. पुतीनने स्वतःला ‘पिटर द ग्रेट’ समजणे अथवा एर्डोगन यांनी स्वतःला ‘ऑटोमन सुलतान’ समजणे. अथवा आपणास इराणचे देखील उदाहरण घेता येईल- येथील नेते मंडळीना आपल्या पर्शियन भूतकाळाविषयी अमर्याद अभिमान असतो. यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणून पाहिल्यास चीनची नेतेमंडळीदेखील आपल्या प्राचीन संस्कृतीविषयी अतिशय अभिमानी असतात आणि त्यामुळेच नजीकच्या काळात आपल्या राष्ट्राचा जगातील एक महत्त्वाची महासत्ता म्हणून उदय होण्याच्या शक्यतेविषयी ते अधिकच आशावादी असतात.

कॅनडामध्ये सोमवार, 21 ऑक्टोबरला सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. मी तिथे होतो तेव्हा, म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, निवडणूकप्रचार शिगेला पोहचला होता. आणि त्यामुळेच तेथील स्पर्धात्मक राजकारण माझ्या नजरेस पडू शकले. कधी काळी निष्काळजीपणे केलेल्या वर्णद्वेषी कृत्यामुळे विद्यमान उदारमतवादी पंतप्रधानांवर दांभिकतेचा आरोप होत होता. तर याउलट प्रतिगामी शक्तींना मत न देण्याचे आवाहन उदारमतवादी (लिबरल) पक्ष जनतेला करत होते. कारण, प्रतिगामी शक्तींच्या सत्तेत येण्याने शिक्षण आणि आरोग्य यासारख्या सार्वजनिक क्षेत्रांतील खर्चांना मोठी कात्री लागण्याची शक्यता होती. दुसरीकडे नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी आणि ग्रीन पार्टी हे पक्ष कॅनेडियन जनतेला या दोन मुख्य पक्षांना सोडून त्यांना संधी देण्याचे आवाहन करत होते.

लक्षात घेण्याजोगी बाब अशी होती की, या निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्राच्या ऐतिहासिक (खऱ्या किंवा काल्पनिक) उपलब्धींना खचितच कुणी अधोरेखित करताना दिसले. कोणताच नेता कॅनडाला पुन्हा महान बनवण्याच्या (मेक कॅनडा ग्रेट अगेन) वल्गना करताना दिसला नाही. जी कुणी व्यक्ती कॅनडाची पुढील पंतप्रधान म्हणून निवडून येईल ती कॅनेडियन संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकवून मागील 800 वर्षांच्या गुलामगिरीचे उच्चाटन करण्याचे आश्वासन देणार नाही. आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात कॅनेडियन सैन्याचे महत्त्वपूर्ण योगदान असूनही निवडून येणारी व्यक्ती या स्मृती जाग्या करू पाहणार नाही (ही बाब मुख्यत्वे ब्रिटिशांना सांगण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे).

कॅनेडियन लोक बडेजाव न मिरवणारे आणि काहीसे व्यवहारी भासू शकतात, कारण त्यांना अभिमानाने मिरवण्यासाठी इतिहासाचा महान वारसा काही लाभलेला नाही. यामुळेच ते मजबूत अर्थव्यवस्था, परस्पर सहकार्याची भावना असलेला समाज, आणि त्याचबरोबर आणखी चांगली विद्यापीठे व हॉस्पिटलस् निर्माण करण्याकडे आपले पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतात. त्यामुळेच कॅनेडियन लोक आपला बडेजाव मिरवत नसले तरी आपल्याला कॅनडा आणि तेथील जनतेकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.


- रामचंद्र गुहा, बेंगळूरू

(अनुवाद: साजिद इनामदार)
 

Tags:Load More Tags

Comments:

Rahul Ramesh Gudadhe

सध्याच्या सांप्रद कालखंडातील आतिषय वास्तविक स्थिती आहे . फक्त इतिहासाचा मागोवा घेऊन भावनिकता ढवळून राजकीय हित साधने हे आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी पुरेसा नाही हे नक्कीच

Add Comment